समायोजनासाठी समतादूत आक्रमक! ; पुणे ते मुंबई पायी लॉन्ग मार्च काढणार..!

मालवण : समता दूतांचे समाज कल्याणमध्ये समायोजन व्हावे या प्रमुख मागणीसाठी राज्यातील समतादूतांनी पुणे ते मुंबई असा पायी लॉन्ग मार्च काढण्याचा निर्णय घेतला. हा पायी लाँग मार्च 9 ऑगस्ट पासून बार्टी मुख्यालय पुणे येथून सुरुवात करण्यात आला आहे. लाँग मार्चमध्ये राज्यातील समतादूत सहभागी झाले आहेत. जोपर्यंत समायोजनाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबई पर्यंत लाँग मार्च सुरू राहणार असल्याची माहिती समतादुतकडून कडून देण्यात आली.

गेल्या आठ वर्षापासून बार्टीच्या माध्यमातून अनुभवी समतादूत समाजकल्याण विभागाच्या विविध योजना गाव व तालुकास्तरावर प्रभावीपणे राबवण्याचे काम करत आहेत. आपल्या न्याय हक्कासाठी व सामाजिक न्याय विभागामध्ये समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व समतादूत क्रांती दिनापासून बार्टी मुख्यालय पुणे ते मुंबई मंत्रालयापर्यंत लाँग मार्च सुरु करण्यात आला आहे.

 

 

समतादूत यांचे समाजकल्याण विभागात समायोजन करून समाजकल्याण विभागाचे कार्यालय तालुकास्तरावर सुरू करण्यात यावे, यासाठी समतादूतांनी वेळोवेळी शासनदरबारी मागणी सादर केली. समतादूतांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रालय कक्ष अधिकारी प्र. वि. देशमुख यांनी २७ डिसेंबर २०२२ रोजी बार्टीच्या महासंचालकांना समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये शासन सेवेत समायोजन करण्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार बार्टी मुख्यालयाद्वारे १८ मे रोजी प्र. वि. देशमुख यांना समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये समायोजन करण्याबाबत ११४ पानी स्वयंस्पष्ट सकारात्मक अहवाल शासनास सादर केला आहे.

समतादूत यांना समाजकल्याण विभागामध्ये शासन सेवेत समायोजन केल्यास त्याचा लाभ अनुसुचित जातीच्या लोकांना होईल हे अहवालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. अद्यापही हा अहवाल मंत्रालय स्तरावर प्रलंबित ठेवण्यात आलेला असून, तालुकास्तरावर समाजकल्याण विभागाचे कार्यालय व समतादूत यांचे शासन सेवेमध्ये समायोजन याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सामाजिक न्याय खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्यांनी अनुभवी समतादूत यांचे शासन सेवेत समयोजन करून तालुकास्तरावर समाजकल्याण विभागाचे कार्यालय सुरू करावे, शासन आपल्या दारी सकंल्पना खऱ्या अर्थाने पूर्ण करावी अशी मागणी समतादूतांच्यावतीने करण्यात आली आहे.