पत्रकारांवर कोणत्याही परिस्थितीत हल्ला होता कामा नये..! ; मुख्यमंत्री शिंदेंचे विधान.

सावंतवाडी : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांची अलीकडेच पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यात आमदाराने पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिली होती. याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने आता दिलेल्या धमकीप्रमाणे पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली आहे. य़ावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. किशोर पाटील हे शिंदे गटाचे आमदार आहेत. संदीप महाजन हे घरी जात असताना त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला करत त्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारावर कोणत्याही परिस्थितीत हल्ला होता कामा नये. दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन शिंदेंनी दिलं.

तत्पूर्वी पत्रकारावर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. पत्रकाराला ज्या चौकात मारहाण झाली, त्या चौकाचे नाव त्या पत्रकाराच्या स्वातंत्रसैनिक पित्याच्या नावानेच होते. आपल्या मुलाला झालेल्या मारहाणीनंतर त्यांना किती वाईट वाटलं असेल, असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला होता.

दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले आहेत. आपण शिवीगाळ केली हे खर आहे. पण मारहाण केली नसल्याचं ते म्हणाले.