रायगड : जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आत्तापर्यंत या घटनेमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून १७८ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे.
“ही अतिशय दुर्दैवी घटना घडली असून गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रीपासून घटनास्थळी आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बचावकार्यामध्ये अडथळे येत आहेत. या गावातील ४८ कुटुंबांमध्ये २२८ जण राहत होते. तर मातीखाली अडकलेल्या ८० जणांना बचावपथकाच्या जवानांनी वाचवलं आहे. जेसीबी जात नसल्यामुळे दोन ते अडीच टन वजनाचा जेसीबी एअरलिफ्ट करता येईल का असा विचार प्रशासन करत आहे.”
“तर मुख्यमंत्री स्वत: घटनास्थळी असून ते वेगवेगळ्या एजन्सीच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर दादा भुसे, उदय सामंत, स्थानिक आमदार तिथे उपस्थित असून ते नातेवाईकांना आधार देत आहेत. सध्या तरी अडकलेल्या लोकांना वाचवणं हेच मुख्य काम आहे.” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.