सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील श्री सिद्ध महापुरुष समाधी मंदिर या जागृत देवस्थानातील धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तसेच तेथील धार्मिक व पवित्र अशा वस्तूंची तोडफोड केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे समस्त गोसावी समाज व कारिवडे गावचे रहिवासी यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या निवेदनात ते म्हणतात की, आम्ही कारिवडे गावचे रहिवासी असून आम्ही संपूर्ण समाजासह अत्यंत शांततेने व गुण्यागोविंदाने राहतो परंतु आमच्या गावातील समाजकंटक श्री गणपत रामा गोसावी (राहणार कारिवडे) या व्यक्तीने कोणतेही कारण नसताना श्री सिद्ध महापुरुष समाधी मंदिरात भाविक उपस्थित असताना आडदांडपणे व दांडगाईने मंदिरात प्रवेश करून तेथील पुजारी बाबीनाथ यशवंत गोसावी (बाबा बुवा) यांना मारहाण करून त्यांच्या गालाचा चावा घेतला तसेच मंदिर गाभा-यातील पवित्र त्रिशूळ वाकविला व समाधीची विटंबना केली. सदरचे मंदिर सावंतवाडी तालुक्यातील जागृत देवस्थान असून हे मंदिर कारिवडे ग्रामदेवता कालिका माता तसेच ओठवणे येथील श्री देव रवळनाथ या धार्मिक स्थळांशी धार्मिक संबंधाने जोडलेले आहे तसेच सावंतवाडीचे संस्थानिक सावंत भोसले राजघराण्याशी या मंदिराचे धार्मिक संबंध आहेत या मंदिरात दिनांक 09/07/2023 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गणपत रामा गोसावी या व्यक्तीने उपद्रव देण्याच्या उद्देशाने कोणतेही कारण नसताना मंदिरात भाविक उपस्थित असताना पुजारी बाबींनाथ यशवंत गोसावी (बाबा बुवा) या समाजातील जेष्ठ व वयोवृद्ध व्यक्तीस अश्लील शिवीगाळ करून मारहाण तसेच गालाच्या खाली हनुवटी कडील भागाचा चावा घेऊन दुखापत केली व अत्यंत दांडगाइने व बलप्रयोग करून मंदिराच्या गाभाऱ्यात असलेला देवाचा पवित्र असा त्रिशूळ वाकवून तो तोडण्याचा प्रयत्न केला व समाधीची विटंबना करून बुद्धिपुरस्कर व दुष्ट उद्देशाने आमच्या उपासना स्थानाचे नुकसान करून त्यास अपवित्र केले आहे.
यास्तव सदर व्यक्तीवर भारतीय दंड संहिता 1860 कलम 295, 295 अ व 298 या कलमाखाली गुन्हा दाखल व्हावा व पुजारी यांना केलेल्या मारहाणी बद्दल योग्य ती शिक्षा करावी व लवकरात लवकर अटक करावे अन्यथा या घटनेमुळे समाजात वाढणा-या रोषामुळे गावातील धार्मिक व सामाजिक वातावरण बिघडले जात आहे पुढील महिन्यातील धार्मिक उत्सव व कार्यक्रम लक्षात घेता सदर आरोपीस तात्काळ अटक होऊन अधिकाधिक शिक्षा व्हावी, अशी निवेदनाद्वारे मागणी व विनंती करत सावंतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे आज प्रत्यक्ष समस्त गोसावी समाज व कारिवडे गावचे रहिवासी यांनी केली आहे. यावेळी सावंतवाडी पोलीस स्टेशनला गोसावी समाज बांधव व कारिवडे गावचे रहिवासी मोठ्या संख्येने जमले होते