मानवाच्या इतिहासातील आज काळा दिवस ; अमेरिकेने जपानवर टाकला होता अणुबॉम्ब!

मानवजातीच्या इतिहासातील आज एक अतिशय दुर्दैवी दिवस आहे. ७८ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. यानंतर तीनच दिवसांनी नागासकी शहरावर देखील असाच हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांचे भीषण परिणाम जगाने पाहिले. यानंतर दुसरे महायुद्ध थांबवण्यात आलं होतं.

दोन लाखांहून अधिक लोकांचा बळी

अमेरिकेने हिरोशिमावर केलेल्या हल्ल्यामध्ये सुमारे 1,40,000 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, नागासकीमध्ये 74,000 हून अधिक लोकांचा बळी गेला होता. यानंतरही कित्येक महिने या शहरांमध्ये रेडिओअ‍ॅक्टिव्ह पाऊस पडत होता, ज्याचाही नागरिकांवर परिणाम झाला.

लिटिल बॉय अन् फॅट मॅन

6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर डागण्यात आलेल्या अणुबॉम्बचं नाव अमेरिकेने ‘लिटिल बॉय’ असं ठेवलं होतं. तर, 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बचं नाव ‘फॅट मॅन’ असं होतं. या हल्ल्यांची भीषणता पाहून संपूर्ण जग हादरलं होतं. 14 ऑगस्ट 1945 रोजी जपानने मित्र राष्ट्रांसमोर आत्मसमर्पण केलं होतं.

क्योटोला का वगळलं?

अणुहल्ल्यासाठी अमेरिकेने पूर्वी क्योटो शहराला लक्ष्य केलं होतं. मात्र, या शहराला असलेला इतिहास पाहता हा निर्णय बदलण्यात आला. या शहरात कित्येक मुख्य विद्यापीठं, व्यापार केंद्रे आणि दोन हजारांहून अधिक बौद्ध मंदिर होते. यासोबतच, कित्येक ऐतिहासिक स्थळं या शहरात होती. त्यामुळे हल्ल्यासाठी निवडलेल्या शहरांमधून क्योटोला हटवण्यात आलं.

असा सुरू झाला ‘हिरोशिमा दिन’

जगामध्ये अशा प्रकराचा विध्वंस पुन्हा होऊ नये, आणि विश्वशांतीचा संदेश पसरावा यासाठी 6 ऑगस्ट हा दिन ‘हिरोशिमा दिन’ म्हणून मानला जातो. अणुसंहार किती भीषण असू शकतो याची आठवण हा दिवस करुन देतो.